​​एक थी बेगम : अभिनयातून फुललेली पॉवरपॅक क्राईम स्टोरी

ek-thi-begum

​आदित्य​ देशमुख


रोहित शेट्टी, राजू हिराणी ही मंडळी मराठी इंडस्ट्रीतल्या लोकांना विविध रोलमध्ये कास्ट करतात, त्याचं कारण आपल्या लोकांचा अभिनय आणि मिळेल ती भूमिका मनापासून करण्याची तयारी हे होय. मराठी सिनेमामध्ये आपलं पूर्वापार चालत आलेलं कल्चर बऱ्याच वेळेस आड येतं आणि बरेच विषय प्रेक्षक स्वातंत्र्य नसल्यामुळे आपले दिग्दर्शक – निर्माते मांडू शकत नाही. ते स्वीकारलं जाईल की नाही या भीतीने सिनेमात अशी रिस्क कोणी घेत नाही पण ओ.टी.टी प्लॅटफॉर्ममुळे ते आज शक्य झालंय. नेटफ्लिक्स, अमेझॉन, एम.एक्स. प्लेयर अशा प्लॅटफॉर्मंने प्रादेशिक भाषेवर लक्ष केंद्रित केलं, त्यामुळे अनेक निर्मात्यांना मोकळेपणाने त्यांच्या गोष्टी मांडता येऊ लागल्या ज्या सेन्सॉर बंधनात राहून तेवढ्या प्रभावीपणे येऊ शकत नव्हत्या. शक्यतो इथला सगळा कंटेंट खूप डार्क आणि शक्य तेवढं क्रिएटिव्ह गोष्टी वापरून बनवायचा प्रयत्न असतो सचिन दरेकर यांनी सुद्धा अशा १९८० मधल्या अश्रफची गोष्ट याच पद्धतीत प्रभावीपणे मांडली आहे. 
ek thi begum
एकोणिसाव्या शतकातली अश्रागची गोष्ट जिच्या नवऱ्याच्या, मेहमूदच्या मारेकरी असणाऱ्या दाऊद इब्राहिमला संपवायला अश्रफ दुबाईला जायला तयार असते पण त्याआधीच तिचा खून होतो. याच अश्रफ उर्फ सपनाची गोष्ट ‘एक थी बेगम’मध्ये मांडली आहे. सुडाची आग कधीच विझत नाही हेच गृहीतक तयार होतं आणि मुंबईतल्या अनेक गँगचा खुनाचा खेळ चालू होतो. नाना म्हात्रे, भाऊ चव्हाण आणि झहीर भाटकर अशा तिघांच्या नार्कोटिक बिजनेसची ही गोष्टी त्यामध्ये माफिया बनून नवऱ्याच्या खुन्यांना संपवणारी अश्रफच्या भोवती फिरते. त्यात अजून भर असते सगळ्या प्रकाराला मॅनेज करणारा डॉन मक्सुद आणि खतपाणी घालणारा होम मिनिस्टर कदम, पोलीस अधिकारी यशवंत तावडे यांची. अशी सगळी इंटरेस्टिंग पात्र असताना त्यांची कांस्टींग हा महत्वाचा भाग होता. प्रत्येक निवडलेला कलाकार हा तेवढाच ताकदीचा आणि हुशार आहे. अश्रफच्या मुख्य आणि मध्यवर्ती भूमिकेतली अनुजा साठे खूप निडर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून समोर आलेली आहे. तिच्या अभिनयातील सहजता आश्चर्यचकित करणारी आहे. अंकित मोहनच्या झहीरने देखील उत्तम केलं आहे. इथे भूमिकेने कमी लांबीची पण लक्षात राहणारी पात्र म्हणजे सवत्या (संतोष जुवेकर), पत्रकार अंजली (रेशम श्रीवर्धनकर), कमिशनर गोखले (दीपक करंजीकर) आणि भाऊ चव्हाण (विजय निकम) ही होय. त्याच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाच्या समांतर घटना कथेला पूरक ठरतात.
ek thi begum
तसेच मुख्य कथेला उचलून धरणारे इन्स्पेक्टर तावडे (अभिजित चव्हाण), नाना म्हात्रे (राजेंद्र शिसटकर), मक्सुद (अजय गेही), मिनिस्टर कदम (प्रदीप डोईफोडे) आणि सब-इन्स्पेक्टर भोसले (चिन्मय मांडलेकर) या प्रत्येकाने आपला एक औरा उभा करत पात्रांना साजेशी अशी भूमिका केली आहे. कथेच्या मांडणी विषयी बोलताना कथा थोडी प्रेडिक्टेबल होते हे विधान करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला स्क्रीन स्पेस द्यायच्या प्रयत्नात मुख्य गोष्ट अनेक ठिकाणी साईडट्रॅक होते. अनुजा साठे स्वतःला एक्सप्लोर करताना दिसते आणि कथेचा स्पीड तसा संथ ठेवल्याने तिची प्रचंड धावपळ जाणवते. बऱ्याच सीनला कात्री लावता आली असती आणि १४ पेक्षा कमी भागात मालिका अधिक क्रिस्प झाली असती असंही अखेरीस वाटतं.
१९८०चा काळ दाखवताना स्क्रीन कलरटोन पासून गाडी, टेलिफोन, डान्सबार मधलं वातावरण सगळं ऑर्थेंटिक वाटतं. सेन्सॉरशिप नसल्यामुळे कथेचे संवाद खूप मोकळेपणाने लिहिले आहे आणि अशेच दाखले भाई लोकांच्या बोलण्यात असावेत असे चपखल बसले आहेत. सिन डिझाईनमध्ये अनेक जुन्या गाण्यांचा वापर करण्यात आला आहे जी या सिरीजला अजून उत्तम बनवते. कथेचं पार्श्वसंगीत आकर्षक असून त्यात दोन गाणी सुद्धा आहेत. या सिरिजचे संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी सिनेमात अभिनयसुद्धा केला आहे हे विशेष. त्यांचा अभिनय बघता त्यांनी यही क्षेत्राचा विचार करायला हरकत नसावी. एकूणच सेन्सोरशीप नसताना, हिंदी सिरीजेसच्या पार्श्वभूमीवर मराठी क्राईम स्टोरी करायचं हे धाडस यशस्वी नक्कीच झालंय, पण अजून शार्प एडिटिंग आणि कथेला वेग प्राप्त झाला असता अधिक रंजकता वाढली असती हा ही मुद्दा तितकाच खरा आहे.
ek thi begum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here