‘हौस’ अहिराणी सिनेमाची

Ahirani Movies
  • इमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर

खान्देशी चित्रपटांची सुरुवात साधारणत: 2003 च्या आसपास झाली. ही सुरुवात होण्यास मालेगाव चित्रपटसृष्टी उर्फ मॅालीवूड कारणीभूत होती. भरपूर गाणी, भरपूर मेलोड्रामा, बेतासबात कथानक, सातत्य आणि तर्काचे नियम न पाळणारे एकामागोमाग एक येणारे प्रसंग आणि कधीमधी अतर्क्य थिल्लरपणा ही खान्देशी चित्रपटांची वैशिष्टे आहेत. अर्थातच ही चित्रपटसृष्टी प्राथमिक अवस्थेत सल्याने ह्या गोष्टी गृहीत धरलेल्याच आहेत. पन्नास ते साठ हजार किंवा कधीकधी त्याहूनही कमी पैशात तयार होणारे हे चित्रपट ग्रामीण प्रेक्षकांना टार्गेट करुन काढले जातात त्यामुळे ते तिथेच जास्त लोकप्रिय होतात.
ग्रामीण भागातील लोकांना असंही तांत्रिक दारिद्र्याशी काही घेणंदेणं नसतं. उलट बजेट कमी असल्याने हे तर चालायचंच असं ते समजून घेतात आणि आपल्या मातीत तयार झालेल्या या चित्रपटांचं ते मनापासून स्वागत करतात. चित्रिकरणही बहुतांश वेळा खेडेगावातच केलं जातं. चित्रिकरण जर निर्माता-दिग्दर्शक यांच्या गावातच असेल तर बजेट थोडं कमी होतं इतकंच. ह्या चित्रपटांवर बॅालीवूडचा प्रचंड प्रभाव आहे. आपल्या बजेटमध्ये तयार होईल असा चित्रपट ढापण्यापासून त्यातील गाण्यांना विडंबित स्वरुपात वापरण्यापर्यंत हा प्रभाव दिसून येतो. हे चित्रपट कधीच थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाहीत, कारण मुळातच शहरात अहिराणी भाषा बोलणाऱ्या-जाणणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे आणि त्यांना आपल्या बोलीभाषेची लाज वाटते हे देखील सत्य आहे, त्यामुळे अहिराणी चित्रपट पाहणं त्यांना कमीपणाचं वाटतं.त्यामुळे कालपरवापर्यंत रिलीजसाठी या चित्रपटांना लोकल चॅनेल्सवर किंवा VCDवर अवलंबून असावं लागायचं. युट्यूबच्या उदयानंतर आणि सोशल मीडियाच्या सार्वत्रिकीकरणानंतर ही परिस्थिति फारच बदलली आहे.

Ahirani movie
तरीही अहिराणी चित्रपट बनवणे हा अजूनही बराच हौसेचाच मामला आहे. या हौशीत एखादा चित्रपट अपेक्षेबाहेर यशस्वी झाला तर तो नशिबाचा भाग समजला जातो.उदाहरणार्थ बी.कुमार यांचा ‘उबगेल नवरा चक्रम बायका’ हा चित्रपट.कुठल्याही लेव्हलवरची अतिशयोक्ती चालवून घ्यायची तुमची तयारी असेल तर उबगेल नवरा चक्रम बायका हा अगदी परफेक्ट चित्रपट आहे. धोंडू नावाचा एक शेतकरी असतो. त्याची पहिली बायको सुशी हिला मुल होत नाही म्हणून त्याने काशी हिच्याशी दुसरं लग्न केलंय. पण ह्या दुसऱ्या लग्नातूनही त्याला सुख मिळालेलं नाही. उलट ह्या दोघींनी आपल्या उनाड आणि चक्रम स्वभावाने धोंडूला अक्षरशः जेरीला आणलंय. शिवाय गावभर उच्छाद मांडून धोंडूचं जगणं हराम केलंय. त्यांच्या या उनाड कारवायांची कथा म्हणजे हा चित्रपट होय. यात एक लॅाटरीवाल्याचं उपकथानकही आहे पण ते फारसं महत्त्वाचं नाही.

सिनेमात कथानक जवळपास नाहीच. ते नसल्यामुळे बरंच आहे. त्यामुळे एपिसोडिक रचना साकारुन प्रत्येक प्रसंगातला विनोद स्वतंत्रपणे खुलवायला दिग्दर्शकाला वाव मिळालाय. आणि ह्या स्वतंत्र विनोदांवरच हा चित्रपट तगतो. ते फसले असते तर चित्रपट पाहण्यालायक झालाच नसता. ह्या विनोदी जागा जितक्या डिसेंट आहेत तितक्याच उत्स्फूर्त आणि इनोव्हेटिवही आहेत. म्हणूनच बॅालीवुड गीतांच्या चाली लावून तयार केलेली भरमसाठ पकाऊ गाणी असली तरीही हा चित्रपट बोअर होत नाही. तसं पाहिलं तर कथानकाचा भास होईल असा आलेख चित्रपटाला नक्कीच आहे. सुशी आणि काशी आपल्या चक्रम स्वभावामुळे कसा एक गुन्हा करुन बसतात आणि जेलमध्ये जातात हा सिक्वेन्स झाल्यावर आधीच्या घटना त्याला पूरक म्हणून घडल्यात हे आपल्या लक्षात येतं. पण मुळात अख्खा चित्रपटच दिग्दर्शकाने विनोदाच्या पाकात बुडवायचा ठरवलेला असल्याने आपण हा प्रसंगही सीरीयसली घेत नाही. त्या दोघींना शिक्षा होतेय म्हणून आपल्याला त्यांची कीव येत नाही की त्यांना चांगली अद्दल घडली म्हणून आपल्याला आनंदही होत नाही.

या चित्रपटाची मला आवडलेली एक विशेष गोष्ट म्हणजे कलाकारांना आपल्या अभिनयाची आणि दिग्दर्शकाला आपल्या दिग्दर्शनाची मर्यादा ठाऊक आहे, आणि म्हणून त्यांनी मांडलेल्या चौकटीत ते उत्तम काम करुन दाखवतात. कलाकार वास्तववादी अभिनय करायच्या भानगडीत पडत नाहीत आणि दिग्दर्शक नवऱ्याने दुसरं लग्न केल्यावर पहिल्या बायकोला काय वाटलं असेल म्हणून काय तिच्या मनाची अवस्था रेखाटायला बसत नाही. नाहीतर हाच विषय त्याला स्त्रियांच्या व्यथा मांडणारा कौटुंबिक रडकथा म्हणून सहज खपवता आला असता. पण मग अर्थातच हा चित्रपट आज आहे तितका लोकप्रिय झाला नसता आणि त्याला रिपिट व्हॅल्यू मिळाली नसती.
ahirani movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here