‘The boy who harnessed the wind’ : आशेची पवनचक्की

the boy who harnessed the wind
  • अजिंक्य कुलकर्णी

‘द बॉय हू हार्नेस द विंड मिल ‘ (The boy who harnessed the wind) या विल्यम कामकवांबा यांच्या पुस्तकावर आधारित असलेला त्याच नावाचा हा चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यामातून चिविटाल इजिओफोर (Chiwetel Ejiofor) याने दिग्दर्शनात पाऊल ठेवत एक दमदार सुरूवात केली आहे. विल्यम कामक्वांबा (मॅक्सवेल सिंबा) हा ‘मलावी’ या दक्षिण आफ्रिकी प्रदेशातील विंम्बे या ४०-५० कुटुंब असलेल्या गावातील एक १४ वर्षाचा मुलगा आहे. शाळेत जाऊन चांगलं शिक्षण घेण्याची विल्यमला प्रचंड ओढ आहे पण, घरात अठराविश्व दारिद्रय असल्याने ते शक्य नाही. मलावी मधील लोकांना शेती करण्याशिवाय पर्याय नाही. सभोवतालची परिस्थितीच तशी आहे. मलावी सोडून तर कुठे काम मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेती हा एकमेव व्यवसाय त्यांच्यासमोर आहे. गावातील शेतकऱ्याची ठेकेदारांकडून फार लुट होत आहे. या सगळ्या सामाजिक पार्श्वभूमीवर ही कथा घडते .

ट्रायवेल कामक्वांबा(इजिओफोर) व अग्नेस(आयासा मायगा / Aïssa Maïga) हे विल्यमचे आईवडिल घरच्या प्रचंड दारिद्रयाने पिचलेले आहेत. पदरी तीन मुलं (पुढे जाऊन एकूण सहा मूलं होतात) त्यातला विल्यम मधला आहे. मलावी मध्ये पावसाचे प्रमाण अगदीच लहरी. कधीकधी पाऊस हा इतका पडतो की त्यामुळे पुरसदृष्य परिस्थिती निर्माण व्हावी तर त्याच्या पुढच्याच वर्षी थेट दुष्काळच पडतो. तीव्रता इतकी की सगळा सुपडाच साफ. अग्नेस व ट्रायवेलला मनापासून वाटतं की, विल्यमला चांगलं शिक्षण देऊन इंजिनियर बनवावं, त्यासाठी ते मेहनत देखील करत आहेत. पण एकूण सगळ्या परिस्थितीमुळे ते विल्यमच्या शाळेची फी भरू शकत नाही. शाळेचे हेडमास्तर त्याला फी न भरल्यामुळे त्याला शाळेत यायला मज्जाव करतात. तेव्हा नाही शाळेत तर किमान ग्रंथालय तरी वापरण्याची परवानगी तो मिळवतो. ग्रंथालयात त्याच्या हातात पडतं ते एक इंग्रजी पुस्तक ‘Using Energy’ नवाचे. विल्यमला इंग्रजी फार येत नसतं, तो या पुस्तकातील चित्र,आकृत्या पाहून पवनचक्की बनवण्याचा निर्धार करतो. विल्यम मोठा धडपड्या आहे. गावाबाहेरच्या गाड्यांच्या भंगाराच्या डेपोतून फुटके पाईप, इलेक्ट्रिक मोटार,गोळा करतो. या वस्तूंच्या सहाय्याने आपण पवनचक्की बनवून वीज निर्माण करू शकतो असा विश्वास त्याला वाटत असतो. पण एक मोठी समस्या उभी राहते. पवनचक्की साठी त्याला हवा असतो सायकलचा साठा(सायकल फ्रेम) कस मिळवावा ही. घरात दारिद्र्य आपल्या पाचवीलाच पुजलेलं असताना उरल्यासुरल्या सायकलची कुर्बानी कशी द्यायची हा ट्रायवेल च्या समोरचा यक्ष प्रश्न असतो.
the boy who harnessed the wind


https://cinenama.in/2020/04/13/memories-of-beginning-era-of-indipop/

हे सर्व होत असताना भ्रष्टाचाराने मस्तवाल झालेले राजकारणी जनतेसाठी काहीही करत नसतात. लोक भुकेनं तडफडत असतानाही तरी सरकारी यंत्रणा जागेवरून ढिम्म हलत नाही. विल्यम आपल्या या सर्व प्रकारच्या संघर्षाला कसा तोंड देतो, ती पवनचक्की तयार होते की नाही यासाठी चित्रपट बघणेच उत्तम. चित्रपटात दारिद्याचे वास्तविक चित्रण करण्याचे आव्हानात्मक काम सिनेमॅटोग्राफर डिक पोप यांनी कुठेही भडकपणा न दाखवता जास्तीतजास्त नैर्सगीकता कशी येईल याकडे चांगले लक्ष देत केलेले आहे. जेव्हा कुमारवयातील मुलांच्या कथेवर आधारित चित्रपट तयार करायचा असेल तर तो बराचदा बालिश होण्याचा धोका असतो. त्या लहान मुलाची त्या लहान वयात गांभीर्याची असलेली समज व त्याच्या भावना यात दिग्दर्शकाचा तोल जाण्याचा संभव असतो. सुदैवाने तो तोल इजिओफोर ने चांगला सांभाळला आहे. फार भावनिकतेची फोडणी त्याने या चित्रपटाला घातली नाही, त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपल्याला चित्रपट जास्त अपील होतो.चित्रपटाची उंची वाढवण्याचं खरं श्रेय तर सिंबाचे आहे. अभिनयाच्या पहिल्याच प्रयत्न असला तरी पडद्यावर विल्यम साकारण्यात तो कमालीचा यशस्वी झालाय.
चित्रपटातले संवाद हे मलावी व इंग्रजी असे संमिश्र आहेत. एकविसाव्या शतकातही जगाच्या एक कोपऱ्यात असा एक समुदाय आहे ज्यांना आजही (२००१ च्या दरम्यान) दोन वेळचे जेवणही मिळत नाही. हे दारिद्रय पडद्यावर पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्या मनाची कालवाकालव झाल्याशिवाय राहत नाही. या आठवड्यात काहीतरी वेगळं पण वास्तववादी आणि खरं, अस्सल
बघायची इच्छा असेल तर ‘द बॉय हू हार्नेस द विंड मिल’ (the boy who harnessed the wind) हा सक्षम पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही.
the boy who harnessed the wind

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here