कश्यपियन मॉडर्न देवदास : Dev D

DEV D
  • इमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर

मुलीवर खरं प्रेम करणाऱ्या एखाद्या मुलाचा ब्रेकअप झाला असेल आणि तिच्या विरह-दु:खात बुडून तो जर सारखी तिची आठवण काढत असेल तर आपण सहज म्हणतो की अरे बघ याचा तर देवदास झालाय. प्रेयसीचं विरह-दु:ख जरा जास्तच मनावर घेऊन शेवटी स्वता:चा आत्मघात करणारा शरतचंद्र चटोपाध्याय यांचा हा नायक भारतीय प्रेक्षकांना त्यावर आधारित चित्रपटांमुळे, खासकरुन संजय लीला भंसाळीच्या देवदासमुळे चांगलाच परिचित आहे. मग भलेही भंसाळीने आपल्या देवदासमध्ये श्रीमंती थाट दाखवण्याच्या नादात कथानकाचे तीन-तेरा वाजवले असतआणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली पात्रांमधील परस्परसंबंध कल्पना करण्यापलीकडे बिघडवून ठेवले असतीलत्याने आधुनिक पिढीला नव्या पद्धतीने देवदासची ओळख करुन दिली आणि असफल प्रेमाचा फर्स्टक्लास बळी म्हणून देवदासला अमर करुन टाकलं. अनुराग कश्यप तर याच्याही पुढे गेला. त्याने देवदासला चक्क आजच्या इंटरनेट युगातील गोंधळलेला तरुण म्हणून सादर केलं.
अनुराग कश्यपचा देव डी एकदा पाहून काम झालं अशा टाईपचा चित्रपट नाही. एकदा पाहिल्यावर फक्त कथानक समजेल. पण जर त्याला स्वतःमध्ये मुरवून घ्यायचं असेल तर बऱ्याचदा तो पाहण्याची आवश्यकता आहे. कारण तो नुस्ता पाहण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा विषय आहे. तो जितका विकृत आणि वेडाचारी आहे तितकाच स्टायलिश आणि लक्षवेधकही आहे. तो आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो आणि प्रेम अयशस्वी झालं म्हणून आयुष्य बरबाद करुन घ्यायची खरंच गरज आहे का यावर गंभीरपणे विचार करायला लावतो. इथे आधीच सांगणं गरजेच आहे की देव डी वर ब्रिटिश फिल्ममेकर डॅनी बॅायलच्या ट्रेनस्पॅाटिंगचा प्रभाव आहे. पण फक्त प्रभाव घेऊन अनुराग कश्यप थांबलेला नाही. तर त्याने खुद्द डॅनी बॅायलकडून या चित्रपटातील एक विशिष्ट भाग चित्रित करण्यासाठी मदत घेतली होती. त्यासाठी चित्रपटाच्या सुरुवातीला त्याने डॅनी बॅायलचे आभारही मानलेत.
DEV D
अनुराग कश्यपचा देव डी मूळ कादंबरीशी प्रामाणिक राहूनही काळाचा सेटअप बदलून एक वेगळाच परिणाम साधतो. चित्रपटाचे उघडच दोन भाग पडलेले आहेत. पारो-देव आणि चंदा-देव. यातील पहिला भाग हा पारोच्या लग्नानंतर दिग्दर्शकाला फारसा रंगवता आलेला नाही हे माझं वैयक्तिक मत. पण त्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मुळात पारो-देव हा भाग चंदा-देव या भागासाठी सेटअप म्हणून येतो. पारो-देव हा भाग जर प्रॅाब्लेम असेल तर चंदा- देव हा भाग सोल्युशन. पारोच्या लग्नानंतर भरकटलेल्या देवला ती फक्त सावरतच नाही तर आयुष्य नव्याने सुरु करायलाही प्रवृत्त करते. त्यामुळे वो शादी के रास्ते पे चली गई और मै बरदबादीके रास्ते पे ही मूळ देवदासची आत्मघातकी वृत्ती इथं चालत नाही. त्यामुळेच इथल्या देवदासचा शेवट जेव्हा सकारात्मक होतो तेव्हा आपल्याला चांगल्या अर्थाने धक्काच बसतो. अनुराग कश्यपचा देवदास हा आजच्या आधुनिक काळाचा वास्तववादी चेहरा दाखवतो. म्हणूनच त्याच्याशी आपल्याला रिलेट करता येते. ह्या देवदासची काही ठाम मते आणि ठाम आदर्श आहेत.

प्रेम या नात्यातील फिजिकल अँगलचं त्याला आकर्षण आहे. पारोकडे शरीरसंबंधांची बेधडक मागणी करताना त्याला कसलीही लाज वाटत नाही.पारोच्या लग्नानंतर दु:खात बुडालेला देवदास फक्त दारुचाच आधार घेत नाही तर त्याला ड्रग्जही हवेसे वाटते. ज्या वेगाने तो आत्मविनाशाच्या गर्तेत बुडत जातो त्याच वेगाने उसळून वर यायची क्षमताही त्याच्यात आहे. आणि शेवटी पारो आता आपली नाही हे सत्य स्वीकारुन चंदासोबत नव्याने आयुष्य सुरु करायची धमकही तो दाखवतो. अशी ही देवदासची बहुरंगी भूमिका offbeat चित्रपटांचा स्टार अभय देओलने तितक्याच ताकदीने साकारलीये. मुळात आधुनिक देवदासची कन्सेप्ट त्यानेच अनुरागपाशी मांडलेली असल्याने ही भूमिका योग्यरित्या साकारण्याचा सूर त्याला आधीच सापडला होता. ह्या चित्रपटाच्या म्युजिकल वैशिष्टयाबद्दल फारसं कुठे लिहून आलेलं नाही. दर तीन चार मिनिटांनी एक गाणं ह्या हिशेबाने ह्या चित्रपटात जवळपास वीसेक गाणी आहेत, आणि गँग्स ऑफ वासेपूर प्रमाणे त्यात व्हरायटीही भरपूर आहे. इतकी गाणी असूनही ती चित्रपटात उपऱ्यासारखी वाटत नाही. रस्त्यावरुन एखादं वाहन जावं इतक्या सहजतेने ती कथानकात मिसळून जातात आणि प्रस्तुत प्रसंगाची धग अनुभवायला लावतात. चित्रपटाच्या वास्तववादी स्वरुपामुळे त्याला म्युझिकल म्हणता येत नाही. उच्च आदर्श असलेली सकारात्मक पात्रे, कलरफुल सेटस्,
नाचगाण्याला महत्व देणारं कथानक, साधीसोपी मांडणी, भरपूर विनोद ही म्युजिकल चित्रपटांची वैशिष्टये देव डी मध्ये नावालाही नाहीत. पण मुळात देव डी ला आपली गुणवत्ता दर्शवण्यासाठी अशा आणखी एका लेबलची आवश्यकता नाही. त्याचा अजेंडा वेगळा आहे आणि त्यात तो पुरेपूर यशस्वी होतो याहून दुसरं आपल्याला काय हवंय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here