इरफान : द वॉरिअर

irrfan
  • किशोर अर्जुन

लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या घरी जाणे त्याच्यासाठी जणू पर्वणीच असायचे. त्याल कारणही तितकेच मजेदार होते. इतरवेळी वर्षभर फक्त आकाशवाणी जयपूर आणि बिबीसीमुळे कानावर येणार्‍या गोष्टी आत्याच्या घरी पडद्यावर घडताना दिसत असत. आत्याचे घर आणि गावात असलेले एकमेव सिनेमागृह यांच्यामध्ये फक्त एका भिंतीचा अडसर होता. सिनेमा सुरू होऊन काही वेळ झाला की मग आत्या ‘टॉर्चमन’ला सांगून या पोरांना सिनेगृहात जागा मिळवून देत असे. आपल्याला या सिनेजगतात अशीच आपली जागा मिळवावी लागणार आहे, पण त्यासाठी तिथे कोणतीच आत्या असणार नव्हती. की नात्यागोत्याचेही दुसरे कोणी असणार नव्हते. दुर्दम्य आशावाद आणि कठोर मेहनत हेच आपले सख्खे आणि जिवाभावाचे सोबती असणार होते. आणि हा आशावाद त्याने वर्षभरातून एकदा पार होणार्‍या भिंतीच्या अडसराकडून घेतला आणि सदैव जिवंत ठेवला. ती भिंत पार केलीच होती त्यामुळे आता स्वप्नांच्या आणि त्याच्यामध्ये येणारा प्रत्येक अडसर दूर करण्याची हिम्मत साहेबजादे इरफान अली खान म्हणजेच इरफानमध्ये आली होती.
याच काळात वयाच्या साधारण 16 व्या वर्षी नासिरुद्दीन शहा यांना पडद्यावर बघितल्यावर ‘ज्जै बात’ अशी त्याची अवस्था झाली. त्याच वर्षभरात केव्हातरी आत्याकडे पाहिलेल्या ‘जूनून’ मधील राजेश विवेक यांनी केलेल्या बाबाच्या भूमिकेचे गारुड मनावर खूप काळ होते. ही व्यक्ती अशीच आहे की, त्याने हा अभिनय केला आहे, याचा काहीच उलगडा त्याला होत नव्हता. अर्थात तोवर कोणत्याच नाटकात, एकांकितेत कसलेच काम न केल्यामुळे अभिनय कशाशी खातात ते कळत नव्हते. पण गोष्टी सांगण्याची आणि त्याहून ऐकण्याची प्रचंड ओढ होती. आकाशवाणी आणि बिबिसीवरील ‘कहानी’ कानात जीव ओतून ऐकण्याची सवय होती. पण म्हणून अभिनय कळत होता असे नाही. त्यातच या ‘बाबा’ने त्याला घोर लावला. त्याच्या जिवाची ही घालमेल त्याच्या एका परिचिताला कळाली. त्याने सांगितले, ‘हे जर तुला जाणून घ्यायचे असेल, शिकायचे असेल तर एनएसडी शिवाय तुला पर्याय नाही.’ आणि तेव्हापासून मग इरफानला जळी स्थळी काष्टी पाषाणी नाटक, सिनेमा, अभिनय आणि एनएसडी दिसू लागले.
irrfan
प्रख्यात अभिनेते इरफान खान यांचे निधन
एनएसडीमधून उत्तीर्ण होऊन जेव्हा इरफान मायानगरी मुंबईत आला तेव्हा, रोजीरोटीचा सवाल आ वासून होताच. जन्म जरी जयपूर, राजस्थानमधील पठाण कुटूंबात झाला असला तरी, मुंबईत तुम्हांला रम्य भूतकाळ नाहीत तर, दाहक चटके देणार्‍या वर्तमानासोबतच झगडावे लागते. तुमची जी काही वडिलोपार्जित ओळख असते ती विसरून जात, या शहरात नव्याने स्वत:ची ओळख घडवायची असते. आणि हा तर आलेला या स्वप्ननगरीमध्ये राज्य करण्यासाठी लहानपणापासून पडद्यावर पाहिलेल्या, एनएसडीमध्ये शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी. पण यह दुनिया बडी जालीम है, याची जाणीव पहिल्याच काही दिवसात झाल्यामुळे अभिनय तर करायचाच आहे, पण त्यासाठी अगोदर डोक्यावर छप्पर आणि दोन वेळेला अन्न मिळाले पाहिजे, तरच पुढे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे उंबरठे झिजवता येतील. त्यामुळे इथेच नव्याने ओळख झालेल्या एका मित्राच्या मदतीने त्याने दोन वेळेच्या भाकरीची सोय करण्यासाठी काम स्वीकारले. एसी मॅकेनिक म्हणून. आणि योगायोगाचा भाग म्हणजे, त्याही नोकरीत त्याला जी पहिली असाइन्मेंट मिळाली ती होती, देशातील पहिल्या वहिल्या सुपरस्टारच्या, राजेश खन्नांच्या घरातील एसी दुरुस्त करण्याची. या नोकरीत इरफान किती काळ टिकला माहित नाही. पण कोणतेही काम मन लावून आपण करू शकतो. आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी हार मानणार्‍यांमध्ये नक्कीच नाहीत, हे त्याने या काळात अधोरेखित केले.
या नंतर पुढे एक तपाहून अधिक काळ इरफानने सुरुवातीला दूरदर्शन, त्यानंतर स्टार प्लस, सेट इंडिया या सुरुवातीच्या काळातील मनोरंजन वाहिनींवर अक्षरश: जे मिळेल ते काम केले. चंद्रकांता, भारत एक खोज, श्रीकांत, डर, बनेगी अपनी बात, स्टार बेस्टसेलर्स आदींमध्ये विविध भूमिकांमध्ये इरफान प्रेक्षकांना भेटतच होता. त्याचवेळी राकेश मोहन यांनी अनुवादित केलेल्या ‘लाल घास पर निले घोडे’ या नाटकावर आधारित टेलिफिल्ममध्ये तो ‘लेनिन’ म्हणून समोर आला. पण अजून नाव मिळावे असे काहीच घडत नव्हते.
irrfan
आमचा इरफान…

आणि मग एका चुकार क्षणी त्याला मीरा नायर यांनी त्याला ‘सलाम बॉम्बे’ या पुढे जागतिक स्तरावर विविध पुरस्कार मिळवलेल्या आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या सिनेमात एक छोटी भूमिका दिली. त्यानंतर ओळीने 12 सिनेमांत त्याने अशाच नाव नसलेल्या भूमिका केल्या. छोट्या पडद्यावरही काम सुरूच होते. समाधान मिळत नव्हते. पण घर चालवण्यासाठी पैसे मिळत होते. ही अशी मधली 15 वर्षे अशीच गेली. तरुणपणात ‘मृगया’तील मिथुन चक्रवर्तीच्या चेहर्‍यासोबत स्वत:ची तुलना करणार्‍या इरफानला आता वास्तवाची पुरेपूर जाणीव होऊ लागली आणि आपण अशाच भूमिका करणार बहुतेक, अशी त्याने खूणगाठही जवळपास बांधली असणार, भूमिकेसाठी मेहनत वगैरे घेणे ठिकच आहे, पण तशी मेहनत घेण्यासारखी भूमिकाही वाट्याला आली पाहिजे ना? असे इरफानला आता वाटू लागले. आणि याच टप्प्यावर लंडनस्थित दिग्दर्शक असिफ कपाडिया यांनी भारतामध्ये सिनेमाची घोषणा केली. अतीव बोलक्या डोळ्याचा, स्वत:वर मेहनत घेणार्‍या इरफानकडे त्यांची नजर गेली.
आणि… ‘द वॉरिअर’ने त्यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुतांश सिनेमहोत्सवांमध्ये आपली छाप सोडली. आपल्यासोबतच आजवर असलेल्या आणि छोट्या मोठ्या कामामध्ये समाधान मानणार्‍या या अफलातून कलाकाराकडे त्यानंतर बॉलिवूडचे विशेष प्राधान्यांने लक्ष गेले. कारण तोवर आपल्या नेहमीच्या पठडीबाज सिनेसंकल्पनांतून बॉलिवूडदेखील बाहेर येत होते. गतिकीकरणानंतर सिनेमाची, त्यातल्या गोष्टींची व्याख्या देखील बदलत होती. अशा बदलत्या सिनेमासाठी चेहराही तसाच खरा आणि अस्सल पाहिजे होता. इरफान या अशा सिनेकर्मींसाठी मोठी उपलब्धी बनला.
आणि अशाचवेळी 2003 मध्ये आला ‘हासिल’ सारखा पठडीबाहेरचा सिनेमा. ज्याचा लेखक दिग्दर्शक होता, इरफानचा एनएसडीमधील दोन वर्ष ज्युनिअर असलेला तिग्मांशू धुलिया. इरफानमधील अभिनेत्याला तिग्मांशूतील दिग्दर्शकांने एनएसडीमध्येच हेरले होते. त्यामुळेच ‘हासिल’मध्ये त्याने नकारात्मक भूमिका देण्याचे धाडस करु शकला. त्यानंतर चरस, पानसिंग तोमर, बेगम सामरु, साहेब बिवी और गँगस्टर रिटर्न्स, बुलेट राजा आदी तिग्मांशूच्या जवळपास पुढील प्रत्येक सिनेमात इरफान आहे. ‘भूमिकेत परिपूर्णता आणण्यासाठी त्याच्याएवढा स्वत:ला त्रास क्वचितच कोणी दुसरा कलाकार देत असेल. स्वत:च्या कामावर तो कधीही खुश होत नाही. आणि बाब कलाकार म्हणून त्याला जिवंत ठेवत असते.’ असे पानसिंग तोमरसाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार्‍या इरफानबद्दल तिग्मांशूने एका मुलाखतीत नमूद केले होते.
irrfan
‘हासिल’ पाठोपाठ मॅकबेथवर आधारित ‘मकबूल’ मधील भूमिकेमुळे इरफानने आपला वर्ग इतरांपासून वेगळा असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. विशाल भारद्वाजच्या या सिनेमामुळे इरफान भारतामध्ये अधिक सर्वदूर पोहोचला. आणि त्यानंतर आलेल्या ‘रोग’मधील प्रमुख भूमिकेने इरफान सर्वार्थाने बॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर झाला. याचकाळात त्याला ‘हासिल’साठी सर्वोत्कृष्ट ‘खल’ भूमिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा त्याचा पहिला पुरस्कार. यानंतर इरफानकडे वैविध्यपूर्ण सिनेमांची रांगच लागली. यातील काही निवडक सांगायचे तर, मेट्रो, द नेमसेक, स्लमडॉग मिलिऑनर, मुंबई मेरी जान, न्यूयॉर्क, 7 खून माफ, द लंचबॉक्स, किस्सा, डी-डे, हैदर, गुंडे, तलवार, आन, पिकू, नुकता आलेला हिंदी मिडिअम आणि करीब करीब सिंगल या सगळ्याच सिनेमांसाठी इरफानला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनयासाठी गौरवण्यात आले.
‘द वॉरिअर’ पासून नव्या जोमाने सुरू झालेला त्याचा प्रवास गेल्या 18 वर्षांमध्ये फक्त भारतातच नाही तर हॉलिवूड आणि ब्रिटिश सिनेजगतामध्येही वाखाणला गेला आहे. ‘लाइफ ऑफ पाय’ आणि ‘स्लमडॉग मिलिऑनर’ या ऑस्कर पुरस्कार पटकावणार्‍या दोन्ही सिनेमांत इरफान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याने आपल्या आजवरच्या सिनेआयुष्यात दिपा मेहता, विशाल भारद्वाज, तिग्मांशू धुलिया पासून सुजीत सरकार पर्यंत जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या दिग्दर्शकासोबत आणि के के मेनन, दीपिका पदुकोन पासून ते अमिताभ बच्चन पर्यंत कलाकारासोबत काम केले आहे. हॉलिवूडमध्ये देखील तो सातत्याने काम करतो. एनएसडीचा विद्यार्थी असूनदेखील सुरुवातीच्या काळानंतर त्याने रंगमंचावर फारसा वेळ दिला नसला तरी, भारतात आणि भारताबाहेरील टीव्ही चॅनेलवर त्याच्याएवढे काम क्वचितच कोणा अन्य भारतीय कलाकाराने केले असेल. ‘एचबीओ’वरील ‘द ट्रिटमेंट’च्या तिसर्‍या सिझनमध्ये त्याने सादर केलेला ‘सुनील’ अमेरिकेतील प्रेक्षकांची दाद मिळवून गेला.त्याच्याबद्दल ऑस्कर विजेता दिग्दर्शक डॅनी बोयल एकेठिकाणी म्हणतो, ‘इरफान एका कसलेल्या खेळाडू सारखा आहे. जो सतत सर्वोत्तम देण्याचीच अपेक्षा बाळगत असतो आणि त्यासाठी अविरत मेहनत घेतो. त्याला त्याचं पात्र सांगितल्यानंतर, तो त्या पात्राचा गाभा आपल्या अदाकारीमध्ये अत्यंत नेमकेपणाने पकडतो, त्यामुळे दिग्दर्शकाचे काम खूपच सोपं होतं.’
irrfan
इरफान खानचं ‘ते’ वेदनादायी पत्र

त्याच्या काही इतर सहकलाकारांसारखे चर्चेत राहण्यापेक्षा कामात गुंतून राहणे त्याला अधिक आवडते. काम नसेल तर शांतपणे एखादे पुस्तक वाचत बसावे. हा त्याचा स्वभाव. लहानपणापासून तो गोष्टींच्या मागे लागला. गोष्ट ही त्याला जगण्याचा एक सगळ्यात मोठा भाग वाटते. गोष्टच त्याच्यासाठी मनोरंजनाचे साधन, सिनेमाचा पडदा, नाटकातील वास्तव आहे. त्यामुळे तो एकेठिकाणी म्हणतो, ‘मी गोष्ट सांगू शकत नाही, कारण माझी ती सवय नाही. त्यामुळे मी नेहमीच गोष्टी शोधत फिरत राहतो. आणि माझ्यासाठी, माझ्यासारखी एखादी गोष्ट मला या प्रवासात भेटली की मी त्यामध्ये स्वत:ला फिट्ट करून टाकतो. कारण अर्थातच ती गोष्ट माझी नसते आणि फक्त माझ्यासाठीही नसते. ती त्या गोष्ट सांगणार्‍याची असते, दिग्दर्शकाची असते. मला गोष्ट सांगणार्‍यासोबत त्या गोष्टीत तद्रूप व्हायचे असते. कारण ती गोष्टच माझ्यासाठी माझा धर्म असतो.’ आपल्या कामालाच आपला धर्म समजणारा इरफान, दर शुक्रवारी नव्याने येणार्‍यांच्या भाऊगर्दीत म्हणूनच वेगळा दिसतो. आणि त्याला ‘काही’ झालेय असे समजल्यानंतर प्रत्येकाच्या मनात कालवाकालव होते ती त्यामुळेच.
000

त्याला त्याच्या संकल्पना अत्यंत स्वच्छ माहिती असतात. त्यामुळे तो कोणत्याही क्षणी तेवढ्याच आत्मविश्वासाने आपल्या समोर भूमिका मांडू शकतो. घरी असतानाही तो जास्तीत जास्त वेळ आपल्या एखाद्या पात्रावर मेहनत घेतानाच तुम्हाला दिसू शकेल. आपलं पात्र नेमकं कसं बोलेल, चालेल, त्याला काही विशेष लकब असेल का? त्या पात्राची पडद्यावर नसलेली पण त्याच्या व्यक्तिमत्त्वात असलेली एखादी गोष्ट, पार्श्वभूमी असू शकेल का? त्याचा पडद्यावरील पात्राला नेमका काय फायदा किंवा तोटा होऊ शकेल. वैयक्तिक आयुष्यात आणि पडद्यावरील आयुष्यातही तो या सगळ्याचा तो सतत विचार करत असतो. आणि तो असाच आहे. सर्वस्व ओतून काम करणारा.
– सुदिप्ता सिंकदर, इरफानची पत्नी आणि लेखिका 
irrfan khan sudipta

(इरफान इंग्लडला उपचारासाठी गेला असतानाचा ‘झी मराठी दिशा’मध्ये प्रकाशित लेख.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here