आमचा इरफान…

irrfan
  • शिवानी गोखले

दिलखेचक बोलके डोळे, लहानशा जीवणीतलं खट्याळ हसू आणि देहबोलीतला बेफिकीरपणा , हे सगळं आपण शेवटचं पाहिलं ते अंग्रेजी मिडीयम या सिनेमातून. इरफान खान जितक्या थंडपणे पडद्यावर सहज एन्ट्री घ्यायचा तितकीच सहज त्याने आज एक्झिटही घेतली.
इतकी शांतपणे की जाताजाताही कोणाची धावपळ होणार नाही असाच कालावधी त्याने निवडावा या एक्झिटसाठी.
हिंदी, इंग्रजी मालिका, सिनेमे करत करत आपल्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनयातला अष्टपैलू खेळाडू ,पद्मश्री इरफान खान.
पिकूचे प्रोमोज जेव्हा यायला लागले होते तेव्हा दिपिका पडूकोण आणि अमिताभ बच्चन यांची जबराट केमिस्ट्री पहायला मिळणार म्हणून हरखून गेले होते मनातून, पण इरफान-अमिताभ , इरफान-दिपिका ही जी काही केमिस्ट्री जमली होती यात त्याला तोड नाही. सिनेमागृहातून बाहेर पडताना लक्षात राहिला तो इरफानच. भराभरा संवाद म्हणायची सवय असलेला इरफान दिपिकाला जातायेता जे शालजोडीतले हाणत होता ते ज्यांनी पाहिलंय तेच जाणोत.
irrfan khan
प्रख्यात अभिनेते इरफान खान यांचे निधन

पिकूमध्ये भराभरा संवाद म्हणून टाकणारा हाच इरफान लाईफ ऑफ पाय मध्ये मात्र बोलण्यात एक विशिष्ट ठहराव घेऊन त्तटस्थपणे त्या पात्राची कथा मांडताना दिसला.
बिल्लू बार्बरमध्ये तर पडद्याच्या आत घुसून कॉलरला धरून इरफानला विचारावसं वाटत होतं की, अरे बाबा का ऐकून घेतोयस या सगळ्यांचं ? बोल की, सांगून टाक ना तो शाहरूख तुझा लंगोटीया यार आहे ते. 
असं प्रत्येकवेळी इरफान करायचा, त्याचा संघर्ष, त्याची लढाई ,त्याचा बुजरेपणा आपला वाटावा असं काहीतरी इरफान करायचाच.
हासिल मधला खलनायक ,पान सिंग तोमरमधला वेगळाच, लांबचा कुणीतरी वाटणारा इरफान लंचबॉक्समध्ये पुन्हा आपल्या शेजारी आपल्या पंगतीला येऊन बसतो.
ठराविक साच्यातला हिरो दर्शक चेहरा नसतानाही अभिनयाचं नाणं खणखणीत असेल तर काय चमत्कार होऊ शकतो हे इरफानने दरवेळी दाखवून दिलं. आणि म्हणूनच अष्टपैलू, ऑलराउंडर हे बिरूद त्याने अगदी सहजच पटकावलं.
चोपन्न हे काही जाण्याचं वय नाही , हे काही करीअर संपण्याचं वय नाही , आणि वेळ तर अगदीच चुकीची.
इरफान आम्हाला तुझ्या जाण्याचं दुःख एकत्र भेटून, हळहळून व्यक्तही करता येऊ नये हे आमचं दुर्दैव.
irrfan khan
इरफान खानचं ‘ते’ वेदनादायी पत्र


तुला म्हणून सांगते इरफान ,
तुला वाटलं असेल की तू जाताना आजूबाजूला कुणीही नव्हतं, पण तुला काय माहीत
तू कायम आमच्यात होतास आणि असशील.

तुझा धारदार आवाज
तुझा हसरा चेहरा
तुझा आश्वासक वावर
तुझी सहज एन्ट्री आणि
तुझी गुपचूप एक्झिट

हे सगळं आमचं आहे आणि असेल.
म्हणूनच म्हणते,
तुला वाटलं असेल की तू जाताना
आजूबाजूला कुणीही नव्हतं, पण तुला काय माहीत
तू कायम आमच्यात होतास आणि असशील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here