प्रिय इरफान…

irfan
  • संदेश कुडतरकर

एरव्ही वेगवेगळ्या ट्रोल्स, विनोदांनी भरलेली फेसबुक वॉल आज सकाळपासून त्याच्याच फोटोंनी वाहतेय. शोक, आश्चर्याचा धक्का, ही बातमी खोटी असू दे, अशा प्रार्थना, दुःख आणि श्रद्धांजली याव्यतिरिक्त काहीच नाही. फ्रेंडलिस्टमधल्या एवढ्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांना त्याच्या निघून जाण्याने एकत्र आणलंय, हा चमत्कार असू शकत नाही. हे कमवावं लागतं. इरफान खान नामक अभिनयाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठाने ते कमावलंय. सगळ्याच माणसांना एकाच प्रेमाच्या धाग्याने बांधून टाकलंय.
हा लेख लिहितानाही डोक्यातून आजचा दुर्दैवी दिवस का उगवला, हा विचार माझ्या डोक्यातून जात नाहीये. पण तो नाहीये, हे सत्य मान्य करावं लागणार आहे. त्याला कधी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला नाही, तरीही ही आत्मीयता वाटण्याचं काय कारण? चित्रपट खरे नसतात, असं वारंवार सांगणारे माझे बाबाही आज सकाळी ती बातमी वाचून हळहळले. त्याचा अलीकडेच आलेला ’ब्लॅकमेल’ हा चित्रपट मी बाबांसोबत थिएटरमध्ये पाहिला होता, तेवढंच. तरीही हा माणूस जाताना चुटपुट लावून जातो. इतकं आभाळापेक्षा मोठं होण्यासाठी पाय जमिनीवरच असावे लागतात.
त्याचे बरेचसे गाजलेले चित्रपट मी अजून पाहिलेही नाहीयेत. तरीही जे चित्रपट पाहिलेत, त्यात अगदी लहानसहान भूमिकांतूनही तो लक्षात राहिलाय. अगदी पहिल्यांदा त्याला पाहिल्याचं आठवतं ते ’करामती कोटमध्ये. त्यातल्या त्याचा अगदी लहानशा भूमिकेतला चेहराही लक्षात राहिलाय अजून. त्यानंतर कधीतरी अलीकडेच पाहिलेल्या ’एक डॉक्टर की मौत’मधला त्याचा अमूल्यही तसाच. ’लाईफ इन अ मेट्रो’मधला त्याचा हॅप्पी-गो-लकी मॉन्टी विसरता न येण्यासारखा. श्रुतीला पहिल्यांदा भेटायला जाताना पलीकडच्या ऑटोत बसलेल्या मुलीच्या पायांकडे वाकून पाहताना, श्रुती समोर बसलेली असतानाही तिला ऑकवर्ड वाटण्याइतपत निरखणारा मॉन्टी सगळ्या लग्नाळू, सिंगल भारतीय पुरुषांचं अर्कचित्र आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ’लाईफ ऑफ पाय’मधल्या मोठ्या पाय पटेलच्या भूमिकेतही तो फिट्ट बसला होता. ’पिकू’मधल्या राणाच्या भूमिकेत त्याने पोट धरून हसवलं होतं. अमिताभसारख्या दिग्गज अभिनेत्यापुढेही त्याचा अभिनय झाकोळला नव्हता. ’ये साली जिंदगी’मधला प्रीतीच्या प्रेमात गोळी झेलणारा अरुण कसा विसरता येईल? ’तलवार’मधली त्याची अश्विन कुमार या ऑफिसरची भूमिकाही लक्षात राहण्याजोगी. लढाऊ, तरीही शांत.

हे वाचलंत का? :
इरफान : द वॉरिअर
आमचा इरफान…
इरफान खानचं ‘ते’ वेदनादायी पत्र

’करीब करीब सिंगल’मधला त्याने साकारलेला शांत, संयत योगी अनेकांनी हृदयात जपून ठेवलाय. ’ब्लॅकमेल’मधला व्हॅकी देव कौशलही त्याने तितक्याच नीटसपणे साकारलाय. ’कारवाँ’मधला हॉस्पिटलमध्ये पलीकडच्या बेडवर असलेल्या तिच्याशी प्रेमाने हितगुज करणारा रोमँटिक शौकत, चित्रपट चाललेला नसूनही लोकांच्या लक्षात राहतो. ’हिंदी मिडीयम’मधला राज बात्रा हसवता हसवता डोळ्यांत पाणीही आणतो. या सर्व भूमिकांपेक्षा त्याच्या दोन चित्रपटांमधल्या भूमिका माझ्या सर्वाधिक आवडत्या. ’द लंचबॉक्स’मधला साजन फर्नांडिस. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या शेखला ट्रेनिंग देताना टाळाटाळ करणार्‍या साजनच्या भूमिकेत कित्येक वरिष्ठ पदावरच्या पांढरपेशी कामगारांनी स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं असेल. ’सात खून माफ’मधला वसीउल्ला खान नावाचा संवेदनशील परंतु सुझानाला मारहाण करणारा शायर मनात घर करून राहतो. या एका पात्रात इरफानने अभिनयाच्या, मूड स्विन्ग्जच्या एवढ्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या आहेत की बस. एका क्षणी त्याने ’मुकर्रर्र’; म्हटल्यावर सुझाना विचारते, ’वो कौन है?’ तेव्हा वसीउल्ला हसत म्हणतो, ’आपके चाचा’. इतका रोमँटिक, तरल असलेला माणूस दुसर्‍याच क्षणी बायकोला मारहाण करताना दिसतो.
इतक्या विविधांगी भूमिका साकारणारा हा गुणी नट कधीच कुठल्या वादामध्ये सापडलेला दिसला नाही. वाद उद्भवतील अशी विधानं करताना दिसला नाही. पडद्यावरही तो दिसला, तेव्हा कधीही आक्रस्ताळेपणे माझा अभिनय पाहा, हे सांगताना दिसला नाही. उलट शांत नदीसारखा त्याच्या डोळ्यांतून त्याचा अभिनय वाहताना दिसला. काहीही सिद्ध करायची वखवख नाही. कसल्या प्रसिद्धीचा मोह नाही. मध्यंतरातल्या सिस्का एलईडीच्या जाहिरातींतही तो दिसायचा, तेव्हाही सहज वाटायचा. इतर जाहिराती पाहताना जसं ही जाहिरात कधी संपतेय आणि चित्रपट सुरू होतोय, असं वाटतं, तसं वाटायचं नाही. समांतर आणि व्यावसायिक, दोन्ही प्रकारच्या चित्रपटांत तो तितक्याच सहजतेने वावरला. ’एआयबीने बनवलेलं त्याचं ड्रेक मीम प्रचंड गाजलं. त्याच धर्तीवर त्याने केलेला लाहोरच्या गौरमिंट आण्टीचा व्हिडिओ पाहतानाही हसून पुरेवाट होते. कर्करोगाशी चाललेली त्याची झुंज आज संपली आणि जेमतेम त्रेपन्न वर्षांचं आयुष्य जागून तो निघून गेला सगळ्यांच्या मनात घर करून.
प्रिय इरफान खान,
तुझी आठवण येतच राहील…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here