…आणि रे यांची जन्मशताब्दी

satyajit ray
  • अनिरुद्ध प्रभू

2 मे 2020 पासून सत्यजित रे (satyajit ray) यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. या निमित्त जर आपण सहज आपल्या आजूबाजूच्या, आपल्या भोवती सातत्याने असणाऱ्या माणसांना ‘सत्यजित रे कोण होते?’ असा प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल ते पाहावं म्हणून काही परिचित, निकटवर्तीय यांना तसा प्रश्न विचारून बघितला.
‘सत्यजित रे किंवा राय हे एक प्रसिद्ध भारतीय चित्रपटकार/दिग्दर्शक होते. ते बंगाली होते (बहुतेक). त्यांनी पाथेर पांचाली हा सिनेमा केला जो जगप्रसिद्ध आहे, आणि त्यासाठी त्यांना ऑस्कर मिळाला.’ ही मोजून चार वाक्ये क्रम बदलून ऐकता आली. विशेष म्हणजे हे प्रश्न ज्यांना विचारण्यात आले ते सर्वसामान्य रसिक तर होतेच पण सामान्य माणसांपेक्षा अधिक प्रमाणात सिनेमा, जागतिक सिनेमा बघणारे होते. चित्रपटसृष्टीशी निगडीत असणारे सुद्धा होते. आपल्या मातीतल्या उत्तुंग व्यक्तीमत्वांबाबत उदासीनता असणं आपल्याला नवीन नाही. अर्थात रेंच्या बाबत ही फार काही वेगळी स्थिती आपल्याला दिसत नाही. पण त्यांच्याविषयी चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्यांना चार ओळींपेक्षा अधिक काही सांगता येऊ नये याला दुर्दैवच म्हणावं लागेल.

कलकत्याच्या रवींद्र भवनाच्या मागच्या गल्लीत, बिशप लेफ्रोय रस्त्यावर कधीकाळी वैभवाची साक्ष देत असावी अशा एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रे राहत असत. कलकत्यात मुंबई सारखा किंवा हैद्राबादच्या फिल्मनगर सारखा भाग नाही असं नाही पण रें ना त्याचं आकर्षण कधी जाणवलेलं नव्हतं. जेम्स आयव्हरी, जॉर्ज लुकास ते बीबीसी पासून अनेक आंतरराष्टीय स्तरावरचे प्रतिनिधी त्यांना इथेच भेटायला येत. ‘पथेर पांचाली’ या अगदीच पहिल्या सिनेमापासून ‘लिजेंड’ समजल्या गेलेल्या यां दिग्दर्शकाला इथे भेटणं अगदी कोणालाही सहज शक्य होतं. कलकत्यात रें त्यांच्या नावापेक्षा ‘माणिक दा’ म्हणून जास्त ओळखले जात. रे मूलत: चित्रकार होते. अनेक प्रसिद्ध पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनी बनवली आहेत. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’. रेंचे वडील ‘संदेश’ नामक एक मासिक चालवत. त्यातून लिहित असत. ते गुणही त्यांना मिळाले होते. रेंना संगीताची उत्तम जाण होती. रे सक्रीय राजकरणात कुठेही नसले तरी त्यांना राजकारणाचीही उत्तम समज होती. पण रेंनी हे सगळं एकत्रितपणे सांभाळलं.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण 36 सिनेमे दिग्दर्शित केले (१९५५ पथेर पांचाली – १९९१ आगंतुक). त्यांनी जवळपास तितक्याच सिनेमांसाठी पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन किंवा संकलन सुद्धा केलं. त्यांच्या मृत्युनंतरही त्यांच्या अनेक कथांवर सिनेमे आले. Wes Anderson ने तर २००७ साली केलेल्या “द दार्जीलिंग लिमिटेड’ साठी रेंच्या बऱ्याच सिनेमांच्या पार्श्वसंगीताचा वापर केलाय आणि तसं श्रेयही त्यांना दिलंय. ही कारकीर्द फक्त सिनेमाविषयीची आहे. स्वतंत्र लेखक म्हणून त्यांच्या एकूण १६ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्यात. वडिलांच्या मृत्युनंतर बंद पडलेलं ‘संदेश’ हे मासिक १९६७-६८ मध्ये पुनर्जीवित करून त्यातून ही त्यांचं विपुल लेखन विशेषतः लघुकथा असं झालेलं आहे.
satyajit ray
महानगर: काल आणि आज
रें उत्तम चित्रकार होते. त्यांनी गुरुदेव ठाकुरांच्या ‘शांतीनिकेतन’ मधून त्याचं शिक्षणही घेतलं होतं. त्यांच्या व्यवसायिक कारकिर्दीची सुरुवात ही पुस्तकांसाठी मुखपृष्ठ तयार करणे याच भूमिकेत झाली होती. त्यांनी जवळपास ४०हून अधिक पुस्तकांसाठी मुखपृष्ठे बनवली आहेत. रेंनी भारतातली पहिली फिल्म सोसायटी तयार केली. नंतर व्यावसायिक स्थैर्य आल्यानंतर
देशभरात फिल्म सोसायटीज तयार व्हावीत म्हणून प्रयत्नही केले. हे सगळं सांगण्यामागचं लेखकाचं प्रयोजन इतकंच की आपण एका अफाट पटलावर काम केलेल्या माणसाला चार ओळीत बंदिस्त कसे करून टाकले आहे याची जाणीव करून देणे होय.
रेंच्या रचना अर्थात त्यात चित्रपट, कथा किंवा इतर अनेक निर्मिती साधनं असं सगळंच येतं, त्यांचा आदर करणारा वर्ग मुख्यत: भारतीय नाही हे उघड सत्य आहे. असं का असावं याचं
उत्तर शोधताना आपली उदासीनता दिसतेच पण त्याहीपेक्षा रेंच्या कामाला असणारी वैश्विक जाणिवेची किनार दिसते. रेंच्या रचना भारतीय मातीत घडणाऱ्या असल्या तरीही त्यांचा आशय जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कुठल्याही समाजात, संस्कृतीत वाढणाऱ्या माणसाशी नाळ जोडतो. नाहीतर रेंचा प्रभाव जागतिक स्तरावर नावाजलेल्या आणि स्वतंत्र वैचारिक आणि सामाजिक जाणीवा असलेल्या कैक चित्रपटकारांवर दिसण्याची शक्यता राहत नाहीच.

रचनाकार म्हणून एकतर तुमच्या रचनेचा आशय वैश्विक असतो किंवा मांडण्याची पद्धत वैश्विक असते. रेंच्या बाबत दोन्ही गोष्टी आहेत. त्यांचं जवळपास ९०% काम हे बंगालीसारख्या प्रादेशिक भाषेत असूनही त्यांच्या एकूण कामापैकी ७५% काम हे जागतिक स्तरावर नावाजलं गेलं. मार्टिन स्कोर्सेसीसारखा व्यावसायिकता आणि आशय अशी दोन्हींची सांगड उत्तमरीत्या
घालू शकलेला दिग्दर्शक, “रेंच्या सिनेमाने कविता आणि चित्रपट यांच्यामधली रेषाच पुसून टाकली.” असं विधान करतो त्याला पार्श्वभूमी हीच आहे.
सत्यजित रेंच्या आधी किंवा समकाळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले सिनेमे नव्हते का? अर्थातच होते. १९३७च्या ‘संत तुकाराम’ पासून १९५३च्या ‘दो बिघा जमीन’ पर्यंत अशी अनेक उदाहरणं देता येतील. खुद्द बंगाली लिजेंड ऋत्विक घटक आणि मृणाल सेन सुद्धा रेंना समकालीन होते. आपण मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला इथे बाजूला ठेवू. या दोघांनीही रें इतकंच समांतर सिनेमाला वजन प्राप्त करून दिलं. ते दोघेही शैली आणि कथाकथनाच्या पद्धतीबाबत वेगळे आणि वैशिष्टपूर्ण आहेत. पण तरीही रेंच्या तुलनेत त्यांना वैश्विक प्रसिद्धी नाही. अर्थातच याच्या मागे रेंच्या कामाला असलेली वैश्विकतेची किनार आहेच पण अजून पुढे जाऊन शुद्ध व्यावसयिक दृष्टीही आहे. रेंना सुरुवातीलाच जीन रेन्वार सारख्या उत्तम दृष्टीच्या दिग्दर्शकाबरोबर काम करता आलं. त्यांनी १९४७ साली वृत्तपत्रात लेख लिहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची सुरुवात झाली. पुढे त्यांना जे जे गवसलं ते ते त्यांनी त्यांच्या कलाकृती मधून समोर ठेवलं.
रेंच्या जागतिक किंवा भारतीय सिनेमावरच्या प्रभावाविषयी अनेकदा बोलून झालेलं आहे. आजही जगाच्या कुठल्या न कुठल्या कोपऱ्यात रेंच्या सिनेमाविषयी आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या रचना आणि रचनाकारांविषयी चर्चा होत असणार आहेच. जोपर्यंत सिनेमा आहे तोपर्यंत ही चर्चा होत राहील हे ही सत्य आहे. पण पाश्चात्यांची रेंकडे बघण्याची दृष्टी आपल्यापेक्षा अधिक जिज्ञासू आणि व्यापक आहे हे नाकारता येत नाही, येणार नाही. उदाहरण द्यायचं झालं तर युरोपमध्ये असणारं रे म्युजिअम किंवा २०१३ साली ब्रिटीश फिल्म म्युजिअमने भरवलेलं रेंच्या ग्राफिक्सचं प्रदर्शन. एखाद्या रचनाकाराला किती वेगवेगळ्या अंगाने समजून घेता येऊ शकतं याची संधी चिकित्सा किंवा त्याचा विचारही आपल्या मनात आला नसावा यामागे नक्की काय असावं?
satyjit ray
रेंची जीवनकथा एका उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ती म्हणजे ऑस्कर होय. मागे मराठीमधल्या एका प्रसिद्ध चित्रपट समीक्षकांनी समाजमाध्यमावर एक प्रश्न विचारला होता की ‘ऑस्कर हा अमेरिकेचा सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे हे असं वाटतं का?’ यावर्षीच्या निकालानंतर कदाचित मत बदलू शकतं. पण अनेक वर्षं हे सत्य होतं. आणि तसंही ऑस्कर मिळणं हे कामाची गुणवत्ता सिद्ध करण्याचं मानक आहे असंही नाही. अर्थात तसं चित्र किंवा आभास तयार करण्यात अमेरिका यशस्वी झाली हे सत्य आहे. मार्टिन स्कोर्सेसीने त्यावर्षी ६९ जणांच्या
पाठिंब्याची पत्रे अकॅडेमीला दिली नसती तर कदाचित रेंना ऑस्कर कधीच मिळाला नसता. रेंना ऑस्कर मिळाला नसता तर त्यांच्या कामाचं महत्व कमी झालं असतं का? किंवा रेंना ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचं महत्व वाढलं का? असं काही झाल्याचं कुणीही मान्य करणार नाही आणि तसं निदर्शनास ही येणार नाही. म्हणूनच औड्रे हेपबर्न हा पुरस्कार जाहीर करताना म्हणते, “One of the greatest directors at last got his due.” हे वाक्य फार महत्वाचं आहे. तितकंच रेंनी आभार व्यक्त करताना ऑस्कर मिळणं ही best achievement
आहे असं म्हणणं हे ही. दोन्ही वाक्ये ही रुपकं असून अत्यंत सूचक आहेत.
लेखाची सांगता करताना सत्यजित रे या माणसाविषयी विविध कालखंडात विविध नामवंतांनी काढलेले उद्गार इथे द्यावेसे वाटतात. अर्थातच हे उद्गार प्रातिनिधिक आहेत. पण त्यातून तत्कालीन समधर्मी लोकांना रे कसे दिसतात हे आपण पाहू शकतो. आज जन्मशताब्दी वर्षात अनेक ठिकाणी रे, त्यांचं काम, त्यांच्या आठवणी यांचे सोहळे केले जातील. पण शताब्दीनंतर परिस्थिती बदलेल का याचं उत्तर कुणाकडे नाही. आज बंगालच्या बाहेरच्या हिंदुस्तानात रेंविषयी आस्था वाढेल का याचंही उत्तर नाही. सध्यातरी या जन्मशताब्दी निमित्त जितकं जमेल तितकं आकलन समोर आणता येईल तेवढं समोर आणणं हे मात्र आपण करू शकतो.
satyajit ray

“I‘m also a big fan of Satyajit Ray’s body of work. The few interactions I had with Ray are memories I treasure.”
– Martin Scorsese

“Whenever someone speaks from Kolkata, I remember Satyajit Ray’s call, praising me for ‘Godfather I’. ‘We know of Indian cinema through Ray’s works and, to me, his best is ‘Devi’, a cinematic milestone.”
– Francis Ford Copola

“The quiet but deep observation, understanding, and love of the human race, which are characteristic of all his films, have impressed me greatly. … I feel that he is a “giant” of the movie industry. Without the least effort and without any sudden jerks, Ray paints his picture, but its effect on the audience is to stir up deep passions. How does he achieve this? There is nothing irrelevant or haphazard in his cinematographic technique. In that lies the secret of its excellence.”
-Akira Kurosawa

“In Ray, I have noticed a complete filmmaker If he were in Hollywood, he would have proved a tough challenge for all of us.”
-Elia Kazan

“I think it (Pather Panhali) is one of the best films ever made. It is an extraordinary piece of work.”
-Christopher Nolan

satyajit ray

“My only understanding of India (in his younger days) was through the Satyajit Ray films I watched in film festival after film festival. They are incredible. That is how I perceive India — real, warm and unaffected.”
-Keanu Reeves

“One of the greatest directors at last got his due.”
– Audrey Hepburn

“I was honored that one of the world’s greatest directors was eager to direct me. I submitted myself totally to him and found him to be a true actor’s director. His sense of the script and details are unparalleled.”
-Richard Attenborough

“He sat with me, since it (Jalsaghar) was not subtitled. I thought it was one of the most marvelous movies I had seen. He was a tall man and incredibly dynamic.”
-James Ivory

“Satyajit Ray is an extraordinary filmmaker who has had a profound influence throughout the world.”
-George Luca

“Never before had one man had such a decisive impact on the films of his culture… It (The Apu Trilogy) is about a time, place and culture far removed from our own, and yet it connects directly and deeply with our human feelings.”
– Robert Ebert (In the Chicago Sun Times, March 4, 2001)
satyajit ray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here