महानगर: काल आणि आज

Mahanagar
  • सिद्धी नितीन महाजन

साल १९६३. शहरीकरण अन् बदलत्या मूल्यांच्या रेट्यात कात टाकत असलेलं कोलकाता. या शहराचा नूर ब्लॅक अँड व्हाईट असला, तरी स्वप्ने नुकतीच रंगीबिरंगी व्हायला लागली आहेत.बदल इथला स्थायीभाव बनू पहात आहे. या बदलाच्या काळात पारंपरिक भारतीय मूल्यांचा कस लागतोय, अन् त्यातून जन्म घेतेय नव्या सुधारणेची क्रांती. हा बदल अटळ आहे, अन् त्यातून मिळालेलं नवं स्वातंत्र्य उठून दिसत आहे. याला कारण आहे, तो ठळकपणे मिरवणारी एक मध्यमवर्गीय बंगाली स्त्री “बौ” आरती.
निमित्त आहे सत्यजित राय यांच्या “महानगर” (mahanagar) या चित्रपटाचे. या चित्रपटाशी भारतीय स्त्रीच्या आत्मसंवादाचे अनेक पदर जोडले गेले आहेत.जसा जागतिकीकरणानंतर भारतीय समाजाचा चेहरामोहरा बदलला, तसे त्या बदलाचे प्रतिबिंब सर्वप्रथम इथल्या मध्यमवर्गीय अन् पुराणमतवादी कुटुंबात दिसून आले. परंपरेने, वेगवेगळ्या सांस्कृतिक व्याख्या, जबाबदाऱ्या, संकेत या सगळ्यात पुरते जखडून ठेवलेल्या स्त्रीत दिसून आले. तिच्या समोर जेव्हा हा बदलाचा आरसा धरला गेला तेव्हा ती गडबडली, पण लगेच आपल्या या नव्या रूपाला धीराने सामोरी गेली. समाजाच्या दृष्टीने तिची किंमत बदलली.त्या बदलाशी जुळलेल्या नात्याशी आणि तिच्या स्वतःच्या दृष्टीतून तिच्या प्रतिमेत झालेल्या स्थित्यंतरांशी हा चित्रपट जवळचे नाते सांगतो.
कालपर्यंत पूर्णपणे गृहिणी असणारी आरती आज नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडते, घरवालीच्या भूमिकेतून कमावत्या, घर सांभाळणाऱ्या कर्त्या स्त्रीच्या भूमिकेत शिरते. जुन्या वळणाच्या सासू सासर्‍यांच्या मूक विरोधाशी शांततेचा लढा देते.हा लढा आपल्याला जुना वाटत नाही, अगदी आजही. आजही आपल्याला पूर्ण पुढारलेल्या, सुशिक्षित, आत्मनिर्भर स्त्रीच्या डोळ्यात ती आरती दिसतेच.घरात असल्यावर डोक्यावरून पदर घेणारी,पतीच्या निर्णयाला मूक सहमती देणारी आरती.ही आरती घरातून बाहेर पडल्यावर दोन्ही आघाड्या सांभाळायचा कसोशीने प्रयत्न करते. त्यात आपण कुठेतरी कमी पडतोय हे सतत तिला टोचत रहातं.आजूबाजूच्या जवळच्या माणसांकडून तिच्यावर बिंबवलं जात राहतं.त्यामुळे एक उत्तम करियर घडवलं जात असताना घरच्या आघाडीवर ती कमी पडत असेल तर तिच्या प्राथमिकता तिला आजही समजावून दिल्या जातात. या प्राथमिकता सांभाळत आणि तिच्यावर रोखलेल्या अपेक्षांच्या नजरा झेलत आजही ती मार्गक्रमण करते आहे.समाजाच्या एकांगी मानसिकतेशी लढा देते आहे.
mahanagar
आमचा इरफान…

पुरुषाने आर्थिक बाजू सांभाळणे, अन् बाईने रांधा ,वाढा उष्टी काढा, या रामरगाड्यात गुंतून पडणे हे चित्र फार पूर्वीपासून दिसून येते. या लिंगाधारित भूमिका आपल्या मनात खोलवर ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्या समाजाने ठरवून दिलेल्या आहेत.यात जेव्हा बदल होतो, तेव्हा प्रस्थापित ब्रेड विनर असणाऱ्या पुरुषाला असुरक्षित वाटू लागते.सुधारलेले राहणीमान, बदललेले विचार, आलेला आत्मविश्वास लिपस्टिक सारख्या प्रतिकातून ठळक होत होत त्याला टोचू लागतात. ती गॉगल लावून सरळ समोरच्याच्या डोळ्यांत पाहते, अन् त्याची तिच्याकडे बघायची नजर बदलते.रेंची दृष्टी कालजयी आहे.त्यांनी त्या काळी वापरलेल्या सशक्त प्रतिमा आजही लागू होतात.
आजची तिची सुधारणेची प्रतीके मात्र उत्क्रांत झालेली आहेत.वेशभूषा आहे, केशभूषा आहे, अन् साऱ्या देहभूषा आहेत, ज्यातून तिला स्त्री असण्याची एक जाणीव आतून सुखावून जाते. तिच्या आत दडून बसलेली आहे एक अँग्लो इंडियन ईडिथ. तिचे पाश्चात्य राहणीमान, तिथे वेगळ्या वंशाचे असणे, तरीही आत्मसन्मानाने वावरणे, व्यवस्थेच्या डोळ्यात खुपत राहते.इथे अधोरेखित होतात लिंगभेद, वंशभेद. ईडिथ बद्दल समाजाच्या मनात अनेक घाणेरडे पूर्वग्रह ठासून भरलेले आहेत. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना, तिच्या वागणुकीबद्दल वाईट साईट मते नोंदवताना तिच्या बॉसच्या चेहऱ्यावर तिरस्कार ओसंडून वाहतो. हा चेहरा आजच्या काळातील एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वातानुकूलित कक्षात बसलेल्या बॉस/ अधिकारी याचा ही असू शकेल,तुमच्या आमच्या शेजारी अथवा घरात सापडू शकेल.कार्यालयीन ठिकाणी होणारे शोषण नवे नाही. अल्पसंख्यांक समाजाकडे बघण्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आजही बदललेला नाही.आजही समाजातल्या काही घटकांवर बसलेला हीन असल्याचा शिक्का त्यांनी पुसू पाहता पुसला जात नाही.त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनेक प्रयत्न झाले.पण त्यांना दिली जाणारी गौण वागणूक बदलली? की त्यांच्याबद्दलची इतरांची नजर साफ झाली?
mahanagar
इरफान : द वॉरिअर


विषमता काळाच्या ओघात बदलली नाही,समाजाची दृष्टी कमी अधिक प्रमाणात नितळ होत चालली आहे, पण गाभा अजूनही गढूळ आहे. काळाच्या ओघात जीवनशैली सुधारली, पण जुनी पुराणमतवादी मानसिकता अधेमधे त्यात डोकावतेच. त्यातूनही एखादी आरती बंडाचा झेंडा उभा करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याची कास धरते, आणि त्यातून येणाऱ्या वैचारिक सामर्थ्याचा उत्सव साजरा करते.तिच्या या नवीन बदललेल्या रुपाकडे समाज आश्चर्याने बघतो, यात काहीच वावगे वाटत नाही. कारण काळ बदलला आहे, पण पन्नास वर्षानंतरही रूपके तीच राहिली आहेत. ती आपल्या मनात दडलेल्या भांडवलशाही मानसिकतेला रंगेहाथ पकडून देत राहतात.परिस्थिती तीच राहिल्यामुळे आजही आपल्याला आरतीशी व तिच्या वातावरणाशी नाळ जोडता येते.
सत्यजित रेंच्या “महानगर” ची अनुभूती २०२० सालीही आपल्या अवतीभोवती घुटमळत राहते.
mahanagar

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here