हॅपी बर्थडे साई!

  • सिद्धी महाजन

साईपल्लवी सेंथारमाई.
कुरळ्या लांबसडक केसांची, गोड चेहऱ्याची, हसतमुख अशी ही मुलगी दिसायला अल्लड आणि निरागस आहे. पण नाचते अशी, की हिच्याबरोबर दुनिया थिरकत राहते अन् आपले अस्तित्व विसरून जाते. आईपासून प्रेरणा घेऊन शास्त्रीय नृत्य अंगागात भिनवलेली साई पाश्चात्य नृत्यप्रकार तेवढ्याच लीलया हाताळते.(रावडी बेबी हे गाणं आठवा, त्यात हिने धनुषला फिका पाडला आहे.)
साईचा अभिनय तर सहज अन् सुंदर असा आहे. प्रेमम मधील मलर मिस आठवली तर तिचे नुसत्या डोळ्यांनी बोलणे आठवत राहते. निरखत रहावा असा तिचा साधासा पेहराव, अन् गोड असं हसू आहे. आधीच हिरव्यागार असलेल्या त्या चित्रपटात साई अबोलीच्या फुलासारखी शांततेच्या आवरणाखाली स्वच्छंदी उमलून आलेय.आठवते फिदामधली एनर्जीने ओसंडून वाहणारी, खळाळून हसणारी भानू. पडी पडी लेचे मनसु मधली उत्कट प्रेमाची मूर्ती, गूढ, मुग्ध वैशाली. मारी २ असो किंवा ब्लॉकबस्टर एन जी के असो, प्रत्येक चित्रपटात ही मुलगी वेगळा अभिनय असा करत नाही.सारीकडे उठून दिसतो तो तिचा साधेपणा, अन् जणू ही आपल्या शेजारची परकरी किंवा साडीमधली मुलगी आहे, असं वाटून जातं.तिचा सहज सुंदर अभिनय हा गुण आवडीचा आहेच, पण मला साई अधिक आवडते, ती वेगळ्याच कारणासाठी.
सौंदर्य. आपल्या रोजच्या आयुष्यात या सौंदर्याच्या निकषांवर प्रत्येक मुलीचा अगदी घासून कस लावला जातो.त्यात मग मनोरंजन क्षेत्राची गोष्ट तर सांगायलाच नको. गोरा रंग, उत्तम मेकप अन् सरळ रेशमी केस या गुणात्मक मुद्द्यांवर आजची अभिनेत्री, अन् एकूणच स्त्री, पारखली जाते. आपल्या चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रीनी हा कित्ता गिरवला आहे.यथावकाश आजूबाजूच्या मुलीही त्यांचं अनुकरण करू लागल्या.सिंहकटी, कमलनयन अन् चवळीच्या शेंगेसारखा बारीक बांधा, ही पूर्वीपासून चालत आलेली सौंदर्याची व्याख्या भारतीय मुलींच्या मनात घट्ट रुजली आहे.अगदी आपल्या समाजात मुलीला पाहिल्यावर, ती कशी डोळ्यात भरते यावर पहिल्यांदा बोललं जातं.
sai
‘RX100’ अजयच्या सिनेमात, साईची एन्ट्री?

भारतीय सिनेसृष्टीत वजनदार, अघळपघळ अभिनेत्रीला कुणी लीड रोल दिलेला ऐकिवात नाही. याला विद्या बालन सारखे अपवाद असतीलही, पण फारसे नाहीत. कारण ग्लॅमर हुकेल या भीतीने या प्रतीमेबाहेर पडायचे कुणी धाडस केले नाही. बॉलिवुडने तर नाहीच. उलट करीना, कतरिना यांनी हे झिरो फिगरचे खूळ वाढवून ठेवले आहे.
या बाबतीत मला चांगले उदाहरण द्यावेसे वाटते, ते दक्षिणी चित्रपटांतील अभिनेत्रींचे. त्या व्यवस्थित खात्यापित्या, अस्सल भारतीय बांध्याच्या दिसतात. (कुणी कुचेष्टेने गुटगुटीत म्हणेलही.) दिसण्याच्या अवास्तव अपेक्षा त्या निर्माण करत नाहीत. बहुतेक अभिनेत्री गोऱ्या असतात हे मान्य, पण सावळ्या रंगाचे उत्तर भारतीय वावडे तिथे नाही.उरला एक निकष, चेहऱ्याच्या सौंदर्याचा. तोंडावर डाग असणे, पिटिका असणे हे लाजिरवाणे मानले जाते. मेकप करून त्या लपवल्या जातात. नितळ चेहऱ्याचे एवढे आकर्षण आहे, की वेगवेगळी ऑपरेशन ही करून घेतली जातात. चांगले दिसण्याच्या या जीवघेण्या स्पर्धेत अनेक मुली आपले नैसर्गिक सौंदर्य गमावून बसतात. त्यांचं अस्तित्व दिसण्यापुरतच सीमित होऊन जातं.
या पार्श्वभूमीवर साई आपला नो मेकप लुक अभिमानाने मिरवत असते. तिचा चेहरा नितळ नाही, गालावर लाल मुरुमांचे डाग आहेत, चेहऱ्यावर तेलकट चमक आहे. तरीही ती ते लपवत नाही.त्या सगळ्यांबरोबर ती आपले हसू जोडत एक वेगळीच किमया ती करते. तिचे केस लांबसडक, अन् टिपिकल दक्षिणी कुरळे आहेत. ती ते मोकळे सोडून, एका खांद्यावर मिरवत आपले खळाळ हास्य हसत,ठुमके लगावत असते. असते.याहून सुंदर म्हणजे तिने आजपर्यंत एकही मेकअप प्रोडक्टची जाहिरात स्वीकारली नाही.उलट आलेली कोटींची ऑफर तिने धुडकावून लावलेली आहे .अर्थात त्यामुळे तिच्यामधल्या उत्तम अभिनेत्रीला काहीच अडचण आली नाही.

कोणी अनोळखी अप्सरा एका रात्रीत पृथ्वीवर उतरून यावी अन् इथली बनून न जाता शेवटपर्यंत अनोळखी वाटत राहावी, असा प्रकार अभिनेत्रींच्या बाबतीत सध्या दिसून येतो. साई अजिबात बेगडी दिसत नाही.तिचा आवाज घोगरा आहे.तिच्या चित्रपटात ती जास्त सामान्य मुलींसारखी दिसते,जो कथेला अनुसरून तिचा प्लस पॉइंट ठरतो.यामुळे तिची देहबोली अधिकाधिक एक्स्प्रेसिव्ह होत जाते.आपल्या कातील हास्याच्या अन् पदन्यासाच्या जोरावर ती ज्या ज्या चित्रपटात चमकते, तो प्रत्येक चित्रपट अक्षरशः एकटीच खाऊन जाते.
साई उत्तम नर्तिका आहे, तसेच परदेशात शिक्षण घेतलेली उच्चशिक्षित डॉक्टर आहे. तिच्या पहिल्या सिनेमाचे काम तिने डॉक्टरी पेशाचे शिक्षण घेताना मिळालेल्या सुट्टीत पूर्ण केले. तिच्या नावावर तसे मोजकेच चित्रपट आहेत, पण आपल्या नैसर्गिक चार्मच्या जोरावर तिने प्रत्येक चित्रपटात वेगळी छाप उमटवली आहे.
पण या सगळ्यांपेक्षा ती एक माणूस म्हणूनही खूप मोठी आहे, कारण या सदैव रंग बदलणाऱ्या सिनेसृष्टीत तिने आपली मूल्ये मात्र अढळ ठेवली आहेत.आज दक्षिणी अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असूनही तिच्या देहबोली, कृतीस लोभाचा वाराही शिवलेला नाही. “काय भुललासी वरलिया रंगा”, म्हणत तिने एक महत्त्वाचा संदेश आत्ताच्या तिच्या समवयस्क पिढीला देऊ केला आहे, हेही नसे थोडके!

हॅपी बर्थडे साई!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here