अभिनेते दिग्दर्शक गिरीश साळवे यांचे निधन

मुंबई :
बुद्धिबळ, झब्बू सारख्या कलाकृतीमधून नावारूपास आलेले अभिनेते दिग्दर्शक गिरीश साळवे (५५) यांचे सोमवारी संध्याकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. अभिनेते दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत अधिकृत माहिती दिली.
गिरीश साळवे यांची बुद्धिबळ आणि झब्बू या नाटकातली भूमिका विशेष गाजली होती. सहज सुंदर आणि जाणता अभिनय ही त्यांची खासियत होती. विजय तेंडुलकर लिखित ७४ पावसाळ्याचा जमाखर्च या दीर्घांकामधल्या कामाचं विशेष कौतुक झालं होतं. त्यांनी ‘ धुडगूस ‘ या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. मृण्मयी, दिशा या मालिकांमधून देखील त्यांनी काम केलं होतं. कुमारी गंगुबाई नॉनमाट्रिक या गाजलेल्या मालिकेचे शीर्षक गीत त्यांनी लिहिले होते.
काही वर्षांपासून आजारी असलेल्या गिरीश वर त्यांच्या घरीच उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाबद्दल कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here