ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन

‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मे’, ‘एक रुका हुआ फैसला’ यांसारख्या अविस्मरणीय चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचं मुंबईत निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं.
दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. “दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. दुपारी २ वाजता सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. इंडस्ट्रीचं हे सर्वांत मोठं नुकसान आहे. तुमची खूप आठवण येईल,”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीसुद्धा सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘हलकेफुलके विनोद आणि साधेपणा या चित्रपटांतील दोन वैशिष्ट्यांमुळे ते कायम लक्षात राहतील’, असं त्यांनी लिहिलं.


बासू चटर्जी यांचा ३० जानेवारी १९३० रोजी अजमेरमध्ये जन्म झाला. ‘चमेली की शादी’, ‘खट्टा मीठा’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबाची खुसखुशीत, हलकी फुलकी आणि मनाला भावणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडली. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना सात फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा पटकावला होता. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘ब्योमकेश बक्षी’ आणि ‘रजनी’ यांसारख्या मालिकांचंही दिग्दर्शन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here