व्यवस्थेचा बळी…

  • अनिरुध्द प्रभू

बर्‍याचवेळा आपल्याला हवं तसं यश मिळाल्यावरही आपण खूश नसतो. ’सुट्स’मध्ये हार्वी म्हणतो तसा, आपली काही स्वप्न नसतात, फक्त गोल्स असतात, एक मिळवला की दुसर्‍याचा प्रवास सुरू. पण मग नक्की या सिद्ध करण्याच्या प्रवासात आपण खरंच खूश त्याहीपेक्षा समाधानी असतो का? आणि आहोत असं म्हटलं तर मग नैराश्य का येतं? ते ही वरचेवर?
सुशांत गेला. त्याने स्वतः ला संपवलं. ते याच नैराश्याचं टोकं होतं. हे संपवणं, तिथे उभं राहून समोर येणार्‍या प्रत्येकाला सामोरं जाण्यापेक्षा त्याला जास्त सोपं का वाटलं असेल ?
उणेपुरे 34 वर्षांचं आयुष्य त्यात जवळपास 10 वर्षांचं बरी म्हणण्यापेक्षाही चांगली अशी व्यावसायिक कारकीर्द, बर्‍यापैकी पैसा, अमाप प्रसिद्धी, जे सगळं एक माणसाला हवं असतं ते सगळं एकेक करत मिळवून ही त्याला रितं का वाटलं असेल?
मी त्याच्याविषयी शेवटचं काही वाचलं किंवा बघितलं ते तीन दिवसांपूर्वी. एशियन पेंट्सच्या एका व्हिडिओत तो त्याचं मुंबईतलं घर अतिशय प्रेमाने दाखवत होता. त्याची असलेली समज, मत, धारणा, आवड सगळं कसं त्याने त्या घरात एकवटलं आहे यावर भरभरून आणि मनापासून बोलत होता. एक महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ असावा. त्यानंतर परवा बातमी आली की दिशा सेलीन याा त्याच्या माजी मॅनेजरने आत्महत्या केली. आणि आज त्याची बातमी. प्रत्येक घटना एकमेकांशी काही न काही संबंध जोडत असते. पण नक्की काय ?
कुणी बाहेरून येऊन आत प्रस्थापित व्यवस्थेत स्वतःला सिद्ध करून जागा बनवतो, तेव्हा तो त्याचे जितके मित्र बनवतो तितके किंवा त्याहून कैकपटीने जास्त हितशत्रू निर्माण करतो. त्याची इच्छा नसली तरीही. सुशांतची शेवटची फिल्म ’छिछोरे’ व्यावसायिक गणितात खूप यशस्वी होती. पण त्याला त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्याला नंतर काहीच काम मिळालं नाही. बर्‍याच गोष्टी तुमच्या नशिबाच्या असल्या तरीही ’व्यवस्था’ही संस्थासुद्धा या सगळ्या मागे असते हे कोण नाकारेल? त्याला काम मिळत नव्हतं हे देखील खरं असलं तरीही त्याला काम मिळू नये म्हणून देखील हात चालत होते अशा ही बातम्या मधल्या काळात आल्या.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या

माणसाला एकाच वेळी व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य सांभाळावं लागलं की संयम ढळतो. सुशांतच इथेही जवळपास सगळंच गणितं फिसकटलंच होतं. एकाचवेळी दोन्ही बाजू सांभाळणं फार कौशल्याचं आणि तितकंच जिकिरीच काम असतं. काही अनुभव कितीही म्हटलं तरी वयानुसारच येतात. फक्त 34 वर्षाच्या काळात किती आणि काय सांभाळावं किंवा सोडवावं हे कुठे कळतं?
धोनी नंतर त्याला मिळणारी वागणूक बदलत असली तरीही त्याच्या एकूण कारकिर्दीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर तो खरा नैराश्यात गेला होता. त्याचा हा काळ आजचा नसून बराच मोठा आहे. आज तो दिसला कारण त्याने त्याचं टोकं गाठलं. सुशांत हा पहिला चेहरा नाही ज्याला हे सगळं स्ट्रगल करून मिळवलेच नंतर स्थावर करता आलं नाही किंवा असही म्हणता येईल की स्थावर करू दिलं गेलं नाही. पण सुशांत हा त्याचा सगळ्या व्यवस्थेचा सगळ्यात उमदा आणि राजस चेहरा ठरला इतकंच.
सुशांतची आत्महत्या काही अंशी व्यवस्थेच्या वागण्याचा परिणाम असली तरीही ती आत्मिक संघर्षाच्या शेवटी उरलेलं उत्तर आहे हे नाकारता येणार नाही. आपल्याला हवं ते मिळत नाही, त्याहीपेक्षा आपण लायक असून मिळत नाही हे पचवणं जड असतं. त्याला असणारं वजन हे हरक्युलसच्या खांद्यावर असणार्‍या आभाळापेक्षा ही जास्त असतं. आपण सतत आतल्या आत भांडत असतो, स्वतःशी आणि कारणीभूत असलेल्या नसलेल्या व्यवस्थेशीही…
सुशांत गेला. त्याने स्वतः ला संपवलं. ही घटना म्हटलं तर इंडस्ट्रीत आणि एकूणच माणसाच्या रोजच्या जगण्यात काहीही बदल घडवणारी किंवा प्रभाव टाकणारी नाही. पण त्याचं जाणं हे जास्त शॉकिंग आहे. कारण त्याच्याकडे फक्त अभिनेता किंवा नैराश्यग्रस्त अभिनेता इतकंच न बघता तो एका अख्ख्या पिढीचा चेहरा होता असं बघितलं तरच त्यातली दाहकता आपल्याला कळेल. सगळं कमावून ही वयाच्या चौतीशीत सरळ उठून आयुष्य संपवून टाकण्याचा विचार असा एका रात्रीत येत नसतो.
सुशांत सिंह राजपूत हा त्या एका क्षणी बाजू मारून गेलेल्या कृतीचा सगळ्यात सुंदर आणि राजस चेहरा म्हणून नेहमी आपल्यासमोर असेल हेच अंतिम सत्य असेल आजपासून कायमसाठी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here