हवी हवीशी ‘पंचायत’

  • अमृता जोशी

शहरी माणसाला गावाचे एक सुप्त आकर्षण असते. तरीही रोजच्या धकाधकीतून चार-आठ दिवस काढून गावची शांतता अनुभवणे यापलीकडे जाऊन कायमचे गावी स्थिरावण्याची तो कल्पनाही करू शकत नाही. शहरातच एखादी उत्तम नोकरी करत बस्तान बसविण्याची स्वप्नं पाहणार्‍या एका उच्चशिक्षित होतकरू तरुणावर जेव्हा नाईलाजाने एका छोट्या गावात काम करण्याची वेळ येते, तेव्हा त्याच्या आयुष्यात काय उलथापालथ होते त्याचे सहजसुंदर चित्रण म्हणजे Amazon Prime वरची TVF ची विनोदी-नाट्यमय 8 भागांची वेबसीरीज – पंचायत!
अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) पंचायत सचिव म्हणून गावात येतो आणि आपल्याला त्याच्या नजरेतून फुलेरा गाव दिसू लागते. छोट्याश्या पंचायत कार्यालयातच त्याची राहायची सोय केली जाते. सतत काही ना काही प्रतिकूल गोष्टी घडत असल्याने ती नोकरी, गाव, गावकरी या सगळ्यांबद्दल आधीच मनात सूक्ष्म अढी बाळगणारा अभिषेक त्यांपासून अजूनच दूर जाऊ लागतो. कार्यालयात काम करणारे प्रधान ब्रिजभूषण दुबे (रघुवीर यादव), उपप्रधान प्रल्हाद (फैजल मलिक) आणि त्याचा मदतनीस विकास (चंदन रॉय) हे आपापल्या व्यापात असणारे अवलिया आणि पंचायत कार्यालय एवढेच त्याचे जग बनते. शहरात कधीही न अनुभवलेल्या मूलभूत समस्या, सवयीचे नसलेले ग्रामीण जीवन, सोशल लाईफचा अभाव आणि सरकारी नीरस काम यांमुळे त्याला आयुष्याची गतीच थांबल्यासारखे वाटते. स्वतःच्या नशिबावर तो कितीही चिडलेला असला तरीही संपूर्ण मालिकेत कुठेही ग्रामीण भागाची खिल्ली न उडवता परिस्थितीजन्य विनोद उत्तमरीत्या साकारला आहे हे विशेष.
शहरी मानसिकतेशी फारकत घेणार्‍या आणि त्यामुळे सुरुवातीला आश्चर्यकारक वाटणार्‍या रूढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा मुळापासून आकार घेताना यात दिसतात. ग्रामीण जीवनातील या अनेक पैलूंवर सूक्ष्म निरीक्षणातून नर्मविनोदी भाष्य करत केलेली वस्तुस्थितीची मांडणी दाद देण्याजोगी आहे. त्यासाठी लेखक चंदन कुमार आणि दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांचे विशेष अभिनंदन! प्रत्येक भागात पंचायतीच्या अथवा गावाच्या संदर्भात घडणारी एखादी घटना घेऊन त्याची अभिषेकच्या आयुष्यात होणारी ढवळाढवळ दिसते. त्यावर त्याची कधी रागीट, वैतागलेली, अचंबित तर कधी सपशेल हार मानणारी प्रतिक्रिया जीतूभैय्याने अभिनयातून सुरेख साकारली आहे.
कान्होजी आंग्रे गरजणार ‘सिनेमा’तून

या निमित्ताने ग्रामीण राजकारणदेखील समोर येते. महिला प्रधानाची जागा राखीव असल्याने त्यावर बायकोला निवडून आणून प्रत्यक्षात स्वतःच कारभार चालवणारे ‘प्रधान-पती’ राजरोसपणे मिरवताना दिसतात. रघुवीर यादव यांचे दीर्घ कालावधीनंतर होणारे दर्शन अफलातून आहे. नीना गुप्ता यांनी अडाणी प्रधान मंजूदेवी अगदी मोजक्या प्रसंगांत पण ठसक्यात साकारली आहे. कार्यालयीन कामकाज न समजणारी पण पतीपेक्षा उत्तम युक्तिवाद आणि निर्णयक्षमता असणारी आणि शेवटाला आत्मविश्वासाने झळकणारी ही धाडसी महिलाप्रधान एकदम आवडून जाते.
गावातील लोक दिसतात तितके साधे नसून बेरकी असतात असा एक सर्वसाधारण शहरी समज असतो. पण एखाद्याला आपले मानले की त्यांची निरागस बाजूदेखील दिसते. अभिषेक खूप एकटा पडला असल्याचे जाणवताच प्रधानजी आणि इतर दोघे त्याला आपल्यांत सामावून घेतात आणि वेळप्रसंगी त्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. त्यामुळे अभिषेकचा एकंदर रोष निवळतो आणि मनाने गावाच्या जवळ येत शेवटी तो गावाच्या प्रेमात पडतो. शेवटाला त्याच्या आयुष्यात येणारे गोड वळण या मालिकेच्या पुढच्या सीझनची उत्सुकता वाढवणारे ठरते.
साधेच पण खुमासदार प्रसंग, खुसखुशीत संवाद, नेटके संकलन, गावाचे संथ जीवन दाखवणारे चलच्चित्रण आणि कथेला साजेसे संगीत मालिकेची रंगत वाढवतात. OTT वरील ठराविक पठडी मोडणारी ही हलकीफुलकी मालिका अगदी न चुकवण्यासारखी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here