‘झी गौरव’मध्ये ‘आटपाडी नाइट’चा डंका

aatpadi night

मुंबई :
झी वाहिनीच्यावतीने देण्यात येणार्‍या झी चित्र गौरव पुरस्कारांचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले. यामध्ये ‘आटपाडी नाइट’ या आपल्या पहिल्याच सिनेमासाठी लेखक-दिग्दर्शक नितीन सुपेकरने तब्ब्बल सहा पुरस्कार पटकावले असून यातील चार पुरस्कार हे त्याला व्यक्तिगत आहेत. ही घटना झी गौरव पुरस्कारांमध्ये प्रथमच होत असून यानिमित्ताने नितीनने विक्रमालाच गवसणी घातल्याने सिनेसृष्टीतून त्याचे विशेष कौतुक होत आहे.
मराठीतील प्रतिष्ठित झी गौरव 2020 पुरस्कारांची नामांकनं 6 मार्च 2020 रोजी पार पडली. त्यानंतर करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. दरम्यान, अटीशर्तींसह चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सरकारचे सर्व नियम पाळत झी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘आटपाडी नाइट्स’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले.
झी गौरव पुरस्काराचं यंदाचं हे 21 व वर्ष. आदिनाथ कोठारे आणि डॉ. निलेश साबळे यांचं खुसखुशीत सूत्रसंचालन, सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी यांच्या डान्स परफॉर्मन्सने कार्यक्रमात बहार आणली. यावर्षी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर. तसंच या वर्षीचा मराठी पाऊल पडते पुढे पुरस्कार ‘तान्हाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना घोषित झाला.
आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर यांना ‘खारी बिस्कीट’ आणि आर्यन मेघजीला ‘बाबा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार मिळाला. ललित प्रभाकर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.
aatpadi night
नितीन सुपेकरची विक्रमाला गवसणी
’आटपाडी नाइट’ या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार्‍या नितीन सुपेकरने यावर्षीचा झी गौरव खर्‍या अर्थाने गाजवला. कारण ’आटपाडी नाइट’साठी नितीनने उत्कृष्ट कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असे चार वैयक्तिक पुरस्कार पटकावले. त्याचसोबत याच सिनेमासााठी अभिनेत्री सायली संजीव हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तर ‘आटपाडी नाइट’ हा सिनेमा यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमाही ठरला. नितीन सुपेकरने नुकताच गोव्यामध्ये ‘बडे अब्बू’ हा कोंकणी सिनेमा दिग्दर्शित केला असून, 2019च्या इफ्फीमध्ये या सिनेमाची निवड झाली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here