इफ्फी आता नोव्हेंबरऐवजी जानेवारीत 

पणजी :
सरकारने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन लांबणीवर टाकले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये यंदाचा इफ्फी होणार नाही. हा महोत्सव पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 16 ते 24 या कालावधीत होणार आहे. एरव्ही 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत इफ्फीचे आयोजन केले जात असते. पण यावर्षी कोविड संकटामुळे नोव्हेंबरमध्ये इफ्फी होणार नाही हे गुरुवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. निर्णय घेण्यापूर्वी जावडेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली.
गोव्यात कोविडचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. रोज पाचशे ते सहाशे नवे रुग्ण आढळतात व आठ ते नऊ जणांचा बळी जातो. या पार्श्वभूमीवर गोव्यात यंदा नोव्हेंबरमध्ये 51वा इफ्फी आयोजित करता येणार नाही, याची कल्पना जावडेकर यांना आली. जानेवारीत गोव्यातच इफ्फी होईल पण हायब्रीड आणि प्रत्यक्षात अशा स्वरूपात तो होणार आहे. कोविडशीसंबंधित सर्व सूचना व प्रक्रियेचे इफ्फीवेळी पालन केले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. गोवा मनोरंजन संस्थेने यापूर्वी नोव्हेंबरमध्ये व्हर्च्युअल इफ्फी होईल, असे म्हटले होते.
मात्र केंद्राने इफ्फीचे आयोजन पुढे ढकलले. येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्सचे पूर्णपणे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत मल्टिप्लेक्स सज्ज होणार आहे. गेल्यावर्षी पन्नासावा इफ्फी गोव्यात पार पडला. इफ्फीसाठी दोनापावल येथे नवा मल्टिप्लेक्स बांधणे, कनवेनशन सेंटरची सोय करणे किंवा इफ्फीसाठी अन्य सुविधा निर्माण करणे गोवा सरकारला गेल्या दोन वर्षांत शक्य झाले नाही याची कल्पना केंद्र सरकारला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here